WELCOME 2

मी राधाकिसन मोटे आपले स्वागत करीत आहे...

Wednesday, April 15, 2020

वडाळा बहिरोबा माझ्या गावची यात्रा..👌

"वडाळा बहिरोबा"

                "वडाळा" म्हणजे ब्रिटिशांनी ठेवलेले नाव *वडाळा मिशन* अजून पण  सरकारी दफतरी हेच नाव आहे.
 परंतु ग्राम दैवत श्री कालभैरवनाथ (बहिरोबा) असल्याने "वडाळा बहिरोबा" असे नाव प्रचलित आहे.
 गावात आल्यावर " ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथाचे मंदिर , ब्रिटिशांनी बांधलेली शाळा दि ओसिपीएम स्कुल, दि रुरल हायस्कुल वडाळा मिशन, फेअर बँक मेमोरियल चर्च, शहरातील सिव्हील हॉस्पिटल पेक्षाही प्रशस्त असे FJFM Hospital Vadala Mission आणि ब्रिटिशकालीन पोस्ट ऑफिस", या प्रमुख वैशिष्ट्य पूर्ण पुरातन इमारती आपल्या स्वागतासाठी उभ्या ठाकलेल्या दिसतील.
याव्यतिरिक्त प्रशस्त अशी ग्रामपंचायत ईमारत, सोसायटी इमारत, जिल्हा बँक शाखा, बडोदा बँक, अनेक पतसंस्था आहेत. अहमदनगर-औरंगाबाद रोडवर शनि-शिंगणापूर पासून अगदी जवळ रोडवर वसलेल्या गावात पाटाचे पाणी असल्यामुळे सर्व क्षेत्र बागायती असून  जास्तीत जास्त बागायतदार शेतकरी या गावात आहेत. नेवासा तालुक्यातील या गावात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहेत. शेजारी सोनईत "मुळा सहकारी साखर कारखाना" व भेंडा येथे "श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना" आहे. गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहातात.

चैत्र पौर्णिमेचे नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी *श्री काळ भैरवनाथाची यात्रा महोत्सव* साजरा केला जातो.


           जत्रा/यात्रा म्हणजे गावाकडील एक गेट टूगेदरच. सर्व पाहुणे, बहिणी, आत्या,सगे-सोयरे,मित्र परिवार, आप्तेष्ट, घरी येतात. गावात, मंदिराजवळ जुने जिवलग मित्र भेटतात. गप्पा गोष्टी होतात जून्या आठवणीने उजाळा मिळतो मन प्रसन्न होते. शेजारील गावातील लोक देखील यात सहभागी होतात. (खरवंडी, म्हां. पिंपळगाव,चांदा, कांगोणी, रांजणगाव देवी, कुकाणा,भेंडा, भा.हिवरे,इ.

गावच्या यात्रेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे :
१) कावड....
        शनिवारी प्रत्येक घरातील एकतरी सदस्य कावड घेऊन निघणार, मिळेल त्या वाहनाने प्रवरासंगम तिर्थी पोहोचून थंड पाण्यात स्नान उरकून स्वच्छ पाणी भरून परतीच्या मार्गाने निघतात. प्रवरेचे ते पवित्र पाणी आणण्यासाठी तांब्या,हंडा, कळशी,भोपळा, इ. चा वापर केला जातो. आनवाणी पायाने प्रवास सुरु करून सर्व कावडीवाले समुहाने गावाच्या दिशेने मार्गस्थ होतात. रात्रीतुन २५ कि.मी. पायी चालून प्रवारासंगम येथून पाणी आणून देवाला आभीषेक घालणे. *Social distancing* वरून आठवलं कावडीला जाणारी मूल पण *"शिवपाला"* होऊ नये म्हणून इतरांपासून _Distance_ ठेवतात.
             दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी पहाटे सारा गाव या कवडी घेऊन येणाऱ्याच्या स्वागतासाठी तयार असे गावचे सरपंच तसेच इतर कारभारी मंडळी सर्वात पुढे पांढरेशुभ्र कपडे घालुन सज्ज असत. ढोल, ताशे,सनाया,फटाके आतिषबाजी आशा प्रकारे मिरवणूक काढुन सर्वांचे स्वागत केले जाते. देवाचा अभिषेक झाल्यावर थोडे पाणी आपल्या घरच्या देवाला व तुळशीसाठी ठेवले जात. घरा-घरातून कावडीच्या लोकांना जेवणाची व्यवस्था केली जाते. माझी आई & आजी यांना कावडीचे फार कौतुक सकाळी लवकर उठून मिरचीचा ठेचा, बेसनाचे पिठले, बाजरीची भाकरी इ. तयार करून मंदीरात पोहच करत. गावातील सर्वच लोक आपापल्या परीने जेवण देत जमा झालेल्या भोजनाचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतला जाई. ज्याला जे जमेल ते देत सर्व गावकरी आनंदाने दोन घास का होईना खात. प्रत्येक घरातून येणाऱ्या या जेवणाची चव न्यारीच होती. घरी गेल्यावर कावडीघेऊन असलेल्यांची खतीरदारी सुरु होत "एखादा राजा युद्ध जिंकुन आल्यावर त्याचे स्वागत होते अगदी तसे" घरातील सर्व मंडळीसेवेसाठी तत्पर असत कोणी पाय शेकायला गरम पाणी करून देत तर कोणी मायेनं विचारपूस करत असत सर्वांचे हे प्रेम पाहून 25 कि. मी. चालल्याचा शिन हलका होत असे. मंग हा कावडीवाला वाघ संध्याकाळ पर्यंत झोप घेऊन परत यात्रेत जाण्याची तयारीत असत.

२) दुकाने / स्टॉल
                पंचक्रोशीतील अनेक हलवाई, खेळणीवाले,  फुगेवाले, बासरीवाले इ. आपापले दुकाने सजवून मंदिर परिसरात तयार असत वर्षभर या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहत असत. दुसऱ्या दिवशीही गावात हीच दुकाने परत लावली जातात. यात्रेत जिलेबी व भेळ खाण्याचा मोह तर कुणालाच आवरता येत नाही. कितीही धुळ असली तरी हलवाईच्या दुकानातून खाऊ घेतला जातोच. विविध प्रकारचे रहाट,पाळणे, झोपाळे यात बसण्याची मज्जा वेगळीच. लहान तर लहान मोठेही यात सहभागी होत. खेळण्या तर घरी पोहोचे पर्यंत टिकत नाहीत, हे माहीत असून देखील मुलांच्या हट्टापायी घेतल्या जातात, फुगे, पिपाण्या,कर्कश भोंगे (गाढवाचा भो... भो..!! आवाज येणारे कागदी भोंगे) यासाठी हट्ट धरून मातीत अंग लोळवणारे मुले पाहुन आपले बालपणीचे प्रताप आठवून हसु येते. आजकालच्या शहरांतील मुलांना पहिजे ते आता लगेचच उपलब्ध होते त्यामूळे त्यांना यांची किंमत नाही कळणार.आसो..

3) Orchestra / तमाशा...
               जत्रा म्हंटलं आणि तमाशा नाही असे एक गाव सापडणार नाही. जिवंत कला म्हणजे तमाशा हा कार्यक्रम पहाण्यासाठी लहान थोर आसुसले असत. घरातील लोकांच्या नजरा चुकून लपून-छपून तमाशाला जाणे म्हणजे मोठी कसरतच असे.  गावच्या बाजारातळावर तमाशा पहाण्यात जो आनंद मिळ्तो तो बालगंधर्व किंवा इतर नाट्य मंदिरात सुद्धा मिळणार नाही.. तमाशा हा तर फक्त जत्रेतच बघावं.

४) हगामा/ कुस्त्या....

              मातीतील कुस्त्या तर वर्षभर जत्रा सोडून  कुठेच बघायला मिळत नाहीत. पंचक्रोशीतून जमा झालेले बलदंड, पिळदार शरीरयष्टीचे पैहलवान व त्यांचे पिळदार मिशांचे वस्ताद पाहिल्यावर छातीत धडकीच भरत असत. मोठ्या कुस्त्या झाल्या की गावांतील नुकत्याच मिसरूड फुटलेल्या पोरांना मैदानात उतरवून त्यांच्या मुठभर रेवड्यावर कुस्त्या लावल्या जात. कुस्त्या पाहण्यासाठी लहान-थोर भर उन्हात दुपारपासून जागा धरून ठेवायचे. मला आठवते आमचे 80 ते 90 वर्षाचे आजोबा *कै.दामु कुंडलिक मोटे (माडीवाले)* हे हगामा पहाण्यासाठी पांढराशुभ्र फेटा घालून सर्वात पुढे असायचे.

५) शिमिगोंडा/बैलगाडा शर्यत
                पुर्वी शर्यत म्हंटल्यावर पंचक्रोशीतील सर्व शेतकरी आपापल्या जीवापाड प्रेम असणाऱ्या बैलाना घेऊन येत असत. हार-जित याचे विशेष महत्त्व नसे, परंतु गुलाल बैलाच्या पाठीवर पडला की मिशा पिळत, छाती फुगवून शेतकरी मिरवत असे. उन्हा तान्हात, उपाशीपोटी दिवसभर हा खेळ सुरू असे. भान हरपून पाहणाऱ्या लोकांची तोबा गर्दी असत. माझें वडील श्री बबनराव दामोदर मोटे पा. यांचे सोबत हा थरारक असा खेळ पाहण्यासाठी मी अनेक वेळा गेलो त्यामुळे मला या खेळाची मज्जा अनुभवता आलेली आहे. परंतु सध्या या खेळावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे हा खेळ आता खेळवला जात नाही.
             

सालाबादप्रमाणे भरणारी अशी ही दिमाखदार यात्रा या वर्षी "कोरोना व्हायरसचा" प्रादुर्भाव टाळण्यासाठी  रद्द करण्यात आली आहे.
सुट्ट्या काडून यात्रेला जाणारे आम्ही आज एवढया मोठ्या प्रमाणावर सुट्या असून देखिल घरी बसुन आहोत.
असो..परिस्थिती देखील तशीच निर्माण झाली त्यामुळे प्रत्येकानी घरी राहून या "कोरोनाच्या संकटावर मात करायची आहे".

बोला " श्री कालभैरवनाथ भगवान की जय...!"

- राधाकिसन मोटे पाटील.. ✍
📞9860847576.